Tuesday, January 11, 2011

काही दारोळ्या!

प्यायला लागल्यावर चढायचीच
केंव्हा चढते ते कळत नाही
एकदा चढलेली उतरायचीच
उतरणं काही टळत नाही
दारु पिताना एक तत्व पाळावं
सोसेल तेवढीच प्यावी
सगळी संपवायला थोडीच हवी ?
उरली , तर घरी न्यावी!
एक एक पेग कसा
चवी चवीनं प्यायचा
किती पेग झाले याचा
हिशेब असतो द्यायचा
दारू पिऊन झाल्यानंतर
एक लढाई लढायची असते
पार्टीनंतर घरामधली
साफसफाई करायची असते
पिऊन थोडी चढणार असेल
तरच पिण्याला अर्थ आहे
एवढी ढोसून चढणार नसेल
तर आख्खा खंबा व्यर्थ आहे
मी तसा श्रध्दावान
श्रावण नेहमी पाळतो
श्रावणात फक्त दारू पितो
नॉनव्हेज मात्र टाळतो
ज्याची जागा त्याला द्यावी
भलती चूक करू नये
पिताना फक्त पीत रहावं
चकण्यानं पोट भरू नये
वेळच्यावेळी आपण ओळखावी
आपली आपली आणिबाणी
लाज सगळी सोडुन देऊन
ग्लासात घ्यावं लिंबुपाणी
पिऊन तर्र झाल्यानंतर
काय खातोय ते कळत नाही
खाल्ल्यानंतर बिलामधली
टोटल कधी जुळत नाही
आपला ग्लास आपण सांभाळावा
दुसऱ्याला घेऊ देऊ नये
दुसऱ्याचा ग्लास उचलण्याची
वेळ आपल्यावर येऊ नये
अशीही वेळ असते जेंव्हा
कोणीच आपला नसतो
म्हणून आपण प्यायला जातो
तर नेमका ड्राय डे असतो
आपला पेग आपण भरावा
दुसऱ्यावर विश्वास ठेवू नये
आपला ग्लास , आपली बाटली
दुसऱ्यांच्या हातात देऊ नये
असं उगीच लोकांना वाटतं
की दुःख दारूत बुडून जातं
दुःख असतं हलकं हलकं
अल्कोहोलसोबत उडून जातं!
एकदा प्यायला बसल्यानंतर
तुझं-माझं करू नये
तुझी काय , माझी काय
नशा कधी सरू नये
तुला जायचंच असेल तर निघून जा ,
जाण्यासाठी भांडू नकोस
प्यायची नसेल तर पिऊ नको ,
पण दारू अशी सांडू नकोस
आपला आवाज दणकयात हवा
उगाच लाऊडस्पीकर कशाला ?
पिऊन प्यायची तर देशी प्यायची
उगाच फॉरीन लिकर कशाला ?
फॉरीन लिकर कितीही प्यावी
काही केल्या चढत नाही
देशी आपली थोडीशीच प्यावी
दोन दोन दिवस उतरत नाही
घरी बसून दारू प्यायचे
खूप सारे फायदे असतात
हॉटेलमधे , बिल भरायचे
काटेकोर कायदे असतात
आम्ही कधीच दारूमधे
दुःख आमचं बुडवत नाही
दारू नेहमी शुध्दच ठेवतो
भेसळ आम्हाला आवडत नाही
हवा तसा मी चालतो आहे
कोण म्हणतंय ' जातोय तोल ?'
माझ्या मित्रा , माझ्या इतकी
पचवून दाखव , नंतर बोल!
प्रत्येक पार्टीत आपण बोलवावे
काही ' न ' पिणारे मित्र
पार्टीनंतर आपल्याला आपल्या
घरी नेणारे मित्र
पिणाऱ्यांनी समाजाचा
कुठलाच कायदा पाळू नये
जेंव्हा , जिथे , जशी वाटेल
प्यायचा मोह टाळू नये
प्रत्येकानंच आपला आपला
जसा घ्यायचा असतो श्वास
तसा प्रत्येकानं आपला आपला
सांभाळायचा असतो ग्लास

No comments:

Post a Comment